Ad will apear here
Next
समस्येला उत्तर देणारं ‘प्रश्नचिन्ह’

गुन्हेगारी, अज्ञान आणि गरिबी यांच्या गर्तेत फसलेल्या फासेपारधी समाजातील मुलांच्या अंधकारमय स्थितीने अस्वस्थ झालेल्या याच समाजातील मतीन भोसले या संवेदनशील, सुशिक्षित तरुणाने या समाजातील मुलांचे भविष्य बदलण्यासाठी अमरावतीत मंगरूळचव्हाळा येथे ‘प्रश्नचिन्ह’ नावाची संस्था उभारली आहे. त्यामुळे भीक मागून किंवा रानोमाळ फिरून पोट भरणाऱ्या मुलांच्या मनात स्वप्नांचे धुमारे फुटले आहेत. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या समस्येचे उत्तर शोधणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’ या आश्रमशाळेविषयी...
............

समाजातील दांभिकपणाबद्दल प्रश्न विचारणारी ‘प्रश्नचिन्ह’ ही संस्था माणुसकीला जणू पाझर फोडू पाहत आहे. फासेपारधी ही गुन्हेगारीचा शिक्का बसलेली जमात. त्यामुळे या समाजातील लहान मुलांना शाळा माहीतही नाही. अनेक मुलांचे वडील तुरुंगात असतात. ही मुले रेल्वेस्थानके, सिग्नलवर भीक मागून आपले आणि कुटुंबाचे पोट भरतात. हे बघून अस्वस्थ होत असलेल्या मतीन भोसले या तरुणाने ‘आदिवासी फासेपारधी  सुधार समिती’ स्थापन केली. त्याद्वारे तो आणि त्याचे सहकारी या समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करू लागले. रेशनकार्ड मिळवून देण्यापासून अनेक मागण्यांसाठी आंदोलन करून त्यांनी आपल्या समाजाची स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले.

 मतीन भोसले२०१०मध्ये वडाळ्यात खेकडे पकडण्यासाठी गेलेली दोन लहान मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली. २०११मध्ये रेल्वेत भीक मागणारी दोन लहान मुले रेल्वेतून खाली पडून मृत्युमुखी पडली. त्यांचे मृतदेह गावी आणण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या घटनांनी मतीन व्यथित झाला. अज्ञान आणि गरिबीमुळे उकिरड्यावरचे जीवन जगावे लागणाऱ्या या समाजातील मुलांचे भविष्य बदलण्याचा निर्धार त्याने केला. त्यासाठी त्याने स्वतः शिक्षक म्हणून करत असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत गरीब फासेपारधी कुटुंबात जन्मलेल्या मतीनने स्वतः खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन डीएड करून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवली होती. त्याचे लग्न झाले होते, तरीही सुखी आयुष्य झिडकारून त्याने आपल्या सामाजाच्या कल्याणाचा वसा उचलला. त्याच्या घरच्यांना त्याचा हा निर्णय मान्य नव्हता; मात्र तो समाजाच्या भल्याचे काम करतो आहे, हे पटल्यानंतर त्यांनीही साथ दिली. 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरूळ चव्हाळा या त्याच्या गावी त्याने फासेपारधी समाजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरू केली. ही आश्रमशाळा औरंगाबाद-नागपूर महामार्गावर कारंजा लाडपासून ३० किलोमीटर अंतरावर, तर शिंगणापूर चौफुलीपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. घरातील चार बकऱ्या विकून त्याने मुलांच्या पाटी, पेन्सिलीची सोय केली.
 
मुंबई, नागपूर, चेन्नई , हैद्राबाद अशा ठिकाणी जाऊन त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फासेपारधी समाजातील लहान मुलांना एकत्र केले. ही मुले म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने अनेक पालक त्यांना मतीनकडे सोपवण्यास तयार नव्हते; पण त्यांना समजावून त्या मुलांना शाळेत आणण्यात त्याला यश मिळाले. तब्बल १८८ मुले शाळेत आली. त्यांचे जेवणखाण, कपडेलत्ते यांचा खर्च उचलणे सोपे नव्हते. मतीनचे स्वतःचे काही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. त्याने या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी ‘भीक मांगो’ आंदोलन केले; मात्र जिल्हा प्रशासनाने हा गुन्हा ठरवून त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्याची पत्नी सीमा हिने महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला आणि या प्रकाराला वाचा फोडली. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना हे कळल्यावर त्यांनी हस्तक्षेप केला आणि मतीनची सुटका झाली. 

 भीक मांगो आंदोलनातून ६० हजार रुपये जमले होते. त्यातून पत्र्याची शाळा उभारण्यात आली. पारधी बोलीभाषेतून शिकवणारे तीन शिक्षक मिळाले. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली ही तरुण मंडळी तुटपुंजे मानधन घेऊन काम करू लागली. त्यांच्या धडपडीची जाणीव झाल्यावर समाजातूनही मदतीचे हात पुढे आले. जालना येथील ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेने मुलांसाठी एक इमारत बांधून दिली. तसेच दर महिन्याला किराणा सामानही दिले जाते. आज या संस्थेत ४४७ मुले शिकत आहेत. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी ही मुले तेथेच राहतात, जेवतात. दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ३५ विद्यार्थ्यांची एक तुकडी बाहेर पडली आहे. 

एकेकाळी शिकार करणारे, भीक मागणारे हात शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. शिक्षणाची ही  प्रकाशयात्रा या मुलांचे आयुष्य बदलवून टाकेल. कपडे, आहार, शालेय साहित्य, आजारपण अशा अनेक बाबींसाठी येणारा खर्च मोठा आहे. त्या मानाने मिळणारा निधी अपुरा आहे. सरकारचीही कोणतीही मदत नाही. अशी अनेक ‘प्रश्नचिन्हे’ त्यांच्यासमोर उभी आहेत. समाजातून मिळणारे मदतीचे हातच त्याची उत्तरे देऊ शकतील.

संपर्क : 
मतीन भोसले, संस्थापक  : ९०९६३ ६४५२९
नामसिंग पवार, सचिव : ८३९०८ ४६१६६
ओंकार पवार, मुख्याध्यापक : ९६२३९ ६३११४
ई-मेल : prashnchinhaadivasiashramschool@gmail.com
वेबसाइट : http://www.prashnchinha.org/

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZVTBI
Similar Posts
समाजसुधारणेचा ‘प्रयास’ करणारी संस्था डॉ. अविनाश सावजी यांनी सुरू केलेली अमरावतीतील चांदूरबाजार येथील ‘प्रयास’ ही संस्था १९९४पासून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. बालवाडीत जाणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना ही संस्था मदत करते. तसेच नवे सामाजिक कार्यकर्ते घडवण्याचे मोलाचे कामही संस्था करते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘प्रयास’ संस्थेबद्दल
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
बळीराजाला बळ देणारी संस्था आज बलिप्रतिपदा आहे. त्या निमित्ताने ‘लेणे समाजाचे’ सदरात माहिती घेऊ या यवतमाळमधील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कार्याबद्दल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी आधार देण्यापासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठीदेखील ही संस्था काम करते.
अनाथ, वंचितांच्या विकासासाठी झटणारे हरी ओम बालगृह अहमदनगर जिल्ह्यातील हरी ओम बालगृह ही संस्था अनाथ, वंचितांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ लोकसहभाग व इच्छाशक्ती यांच्या जोरावर ही संस्था अडथळ्यांवर मात करत आपले कार्य नेटाने करते आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज जाणून घेऊ या टाकळी खंडेश्वरी या गावातील हरी ओम बालगृह या संस्थेविषयी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language